जन्मकथा शनि महाराजांची

ब्रम्हदेवाचा पुत्र मरिची, मरीचीचा पुत्र कश्यप, कश्यपाचे पुत्र द्वादश, आदित्य, मार्तंड यापैकी मार्तंड हा अत्यंत प्रतापशाली आहे.

देवशिल्पी विश्वकर्माने आपली संज्ञा नावाची अत्यंत तेजस्वी कन्या मार्तंडला दिली या संज्ञेला सूर्यापासून (मार्तंडापासून) दोन मुले झाली पुत्राचे नाव यम व मुलीचे नाव यमुना, मार्तंडचे तेज अत्यंत प्रखर असे होते ते संज्ञेला सहन होईना तेव्हा तिने आपल्याच रुपाची प्रतिमा निर्माण केली तिचे नाव छाया. छायेला घरात ठेऊन संज्ञा घोडीचे रूप धारण करून तप करण्यासाठी उत्तरकुरुप्रदेशात निघून गेली जाताना तिने हि गोष्ट मार्तंडाला न सांगण्याबद्दल छायेला बजावले छायेनेही ते कबुल केले.

छाया मार्तंडाच्या घरी संज्ञा म्हणूनच राहू लागली, यम व यमुनावर ती आपल्या मुलांप्रमाणे प्रेम करू लागली पुढे छायेला सूर्यापासून दोन मुले झाली पुत्राचे नाव शनि व मुलीचे नाव तपती किंवा तापी.

शनिचा जन्म पौष शु. अष्टमी शनिवारी संध्याकाळी झाला, शनिने आपला प्रताप जन्मापासूनच दाखविण्यास सुरवात केली. पुत्र जन्माची वार्ता ऐकूण सूर्य आपल्या रथातून पुत्र मुख पाहण्यासाठी आला. त्यावेळी शनिची दृष्टी सूर्याच्या सार्थ्यावर पडताच तो पंगु झाला व रथाचे घोडे अंध झाले मग कृपादृष्टीने शनि पाहताच ते पूर्ववत झाले.

पुढे छाया मुलांशी भेदभावाने वागू लागली, यमाला व यमुनेला सावत्र भावा प्रमाणे वागवू लागली हे जेव्हा सूर्याला कळाले तो रागाणे लाल झाला तो छायेला म्हणाला आपल्या मुलांशी भेदभावाने वागतेस हे योग्य नाही, तरी छायेच्या वागणुकीत फरक होईना. यम एकदिवशी आपल्या पित्याला सूर्याला म्हणाला, पिताजी हि आमची आई नाही कारण हि फक्त शनिवर व तप्तीवरच प्रेम करते माझ्याशी व यमुनेशी शत्रुत्वाने वागते.

यमाने सूर्याकडे केलेली तक्रार ऐकताच छायेला राग आला तिने यमाला शाप दिला तू प्रेतांचा राजा होशील. छायेने असा शाप दिला असता पुत्र कल्याणाची इच्छा असलेला सूर्य यमाला म्हणाला तू काळजी करू नकोस, तू मनुष्यांच्या पापपुण्याचा निवडा करशील आणि लोकपाल म्हणून स्वर्गात प्रतिष्ठा तुला प्राप्त होईल, त्यावेळी छायेवर सूड उगविण्यासाठी सूर्याने शनिला शाप दिला “पुत्रा तुझ्या मातेच्या दोषामुळे तुझ्या दृष्टीतही क्रूरता राहील”

मग सूर्याला कळले कि छाया हि आपली खरी पत्नी नव्हे त्याने छायेला खरा प्रकार विचारला मग तो जेथे संज्ञा तप करीत होती तेथे गेला नंतर तिला प्रसन्न करून सूर्य आपल्याबरोबर तिला घेऊन आले.

कथा शनि मारुतीची

शनि मारुती बद्दल अशी एक लोक कथा सांगितले जाते कि कोणे एके काळी जगाचा अहंकार घालविणाऱ्या शनि महाराजांनाच गर्व झाला व ते त्या नशेत रामभक्त मारुती कडे आले. त्यांनी आरोळी ठोकली, हनुमंता ! आता मी तुझ्या राशीला येणार आहे ! तयार राहा ! बिचारे मारुतीराय काही एक प्रती उत्तर न करता स्तब्धच राहिले. पुन्हा शनि महाराजांनी सांगितले ‘मारुती तू रामभक्त आहेस. म्हणून तुला विचारतोकी, तुझ्या राशीला केव्हां येऊ ! कारण जे देवभक्त, सत्याचे उपासक, जगउद्धारक असतात त्यांच्या राशीला मी येतो, पण ते त्यांच्या इच्छेप्रमाणे व ते सांगतील तितकाच काळ, मारुती हसले आणि म्हणाले, ‘शनिदेव’ माझ्या राशीला लागून तुला काय फायदा ! मी अमर आणि ब्रम्हचारीहि ! आहे त्याच प्रमाणे जगाच्या उलाढाली पासून अगदीच अलिप्त आहे. मला तू त्रास काय आणि कसा देणार ! शनि महाराज म्हणाले, ते काम माझे ! तू रामभक्त आहेस म्हणूनच तुला सतवायचे आहे. सारे साधूसंत, देव-दैत्य साडेसातीतून पार पडले आहेत आता फक्त तुचं उरलास, तुला छळले नाही. तर माझा पराक्रम कमी प्रतीचा ठरेल. मी अजिंक्य ठरणार नाही. झाले ! मारुती म्हणाले, येतो म्हणतोस तर ये बाबा. दुसऱ्या दिवशी पहाटेच शनिमहाराज मारुती समोर येऊन दाखल झाले व त्या रामदुताच्या डोक्यावर बसले. मारुतीने आपल्या दैवी सामर्थ्याने आपल्या भक्तांना अशी आज्ञा केली कि, त्यांनी आज पूजेला आल्यानंतर त्यांच्या डोक्यावर फुले न ठेवता मोठे दगडच मारावेत ! दगडांचा वर्षाव सुरु झाला. ते सर्व दगड अर्थातच शनिमहाराजांनाच लागत एखाद्या चुकून मारुतीला लागलाच तरी ते व्रजदेहीच.

अखेर शनिची घाबरगुंडी उडाली, ते उठावयास लागले मारुतीने त्यांचे पाय पकडून ठेवले आणि म्हटले, बस कि राव नुकतेच आलात आणि एवढ्यात जाता ! अहो आला नाही तोवर तुम्ही जातो म्हणता का ! हि कुठली तुमची मुलखा वेगळी का रीत झाली ! अखेर शनिला आपली चूक कळून आली व त्याने मारुतीयांना वरदान देऊन टाकले कि, आजपासून तुझे जो ध्यान करील त्याला मी छळणार नाही. माझ्या नावाने तुझी पूजा केली तरी ती मलाच पावेल. तेव्हा शनिच्या साडेसातीत गांजलेल्या लोकांनी मारुती आराधना जरूर करावी.